धक्कादायक! पाळीव पिटबुलनं स्वतःच्या मालकिणीचा जीव घेतला

ब्युरो टीम :  पाळीव कुत्र्यानं मालकिणीचा जीव घेतल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घडली. बंगाली टोला परिसरात वास्तव्यास असलेल्या ८० वर्षांच्या सुशीला त्रिपाठी  असे मयत महिलेचे नाव आहे.
सुशीला नेहमीप्रमाणे सकाळी पिटबुल ब्राऊनी आणि लॅब्रेडॉरला फिरवण्यासाठी घेऊन गेल्या. दरम्यान ब्राऊनीनं अचानक सुशीला यांच्यावर हल्ला केला. शरीराच्या अनेक भागांचा ब्राऊनीनं चावा घेतला. सुशीला यांच्या हात, पाय, पोट आणि पाठीवर १२ गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. ब्राऊनीच्या हल्ल्यात सुशीला त्रिपाठी अतिशय गंभीर जखमी झाल्या.
पिटबुलनं हल्ला करताच सुशीला यांनी आरडाओरडा केला. मात्र तिथे कोणीच पोहोचलं नाही. त्यावेळी घरात केवळ मोलकरीण होती. ती काही वेळानंतर पोहोचली. त्यावेळी सुशीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. सुशीला यांची अवस्था पाहून मोलकरणीनं त्यांचा मुलगा अमितला फोन केला.
अमित यांनी त्यांच्या जखमी आईला घेऊन तातडीनं जवळचं रुग्णालय गाठलं. मात्र डॉक्टरांनी सुशीला यांना मृत घोषित केलं. यानंतर सुशीला यांचं शवविच्छेदन करण्यात आलं.  दरम्यान, सुशीला त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही पाळीव कुत्र्यांची खूप काळजी घ्यायच्या, असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने