शिंदे-फडणवीसांचे ठरलं! कोणाच्या वाट्याला कोणती खाती?

ब्युरो टीम:

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता सत्तेत आलेल्या भाजपा-शिंदे गटामध्ये मंत्रीपदं कुणाला किती मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाकडे कोणती खाती राहणार, व भाजपकडे कोणती खाती असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ, महसूल आणि गृहखाते हे भाजपकडे राहील. तर एकनाथ शिंदे गटाला नगरविकास आणि रस्ते विकास महामंडळ खाती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडेही होती. मात्र, या दोन्ही खात्यांच्या कारभारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळे आता भाजपसोबत सरकार चालवताना तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन्ही खात्यांचे संपूर्ण नियंत्रण असेल का, हे पाहावे लागेल.
           दुसरीकडे, शिंदे गटासोबत असणाऱ्या ३९ आमदारांपैकी कोणाला मंत्रिपदं मिळणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ८ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का, हे पाहावे लागेल. अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेल्यास एकनाथ शिंदे गटाच्या वाट्यास काय येणार, हेदेखील पाहावे लागेल.
           गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार, एकनाथ शिंदे गटातील बहुतांश आमदारांना राज्यमंत्री पद आणि महामंडळे देऊन त्यांची योग्य ती सोय करण्यात येईल. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल. शिंदे - फडणवीस यांची याबाबत प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने