आरक्षणाचा निकाल जो येईल तो येईल,ओबीसींना परळीत २७ टक्के जागा देणारच -धनंजय मुंडे

 


ब्युरो टीम: राज्यातील ९२ नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य निवडणुका आयोगाने घोषित केल्या असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या तरी राजकीय आरक्षणाचा निर्णय जो काही येईल तो येईल, आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना २७ टक्के जागा देणार असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.                                                                                      

             दोनच दिवसांपूर्वी राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याच दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ मार्गी लावावा व त्यानंतरच राज्यात निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती.

     मात्र, राजकीय प्रवाहात ओबीसींचे स्थानिक इच्छुक उमेदवार यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा विचार करून, आरक्षणाचा निकाल जो येईल व जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ मात्र आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत २७ टक्के जागा ओबीसी उमेदवारांना देणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.                                                                                                                                                         

        ओबीसी आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे, त्यामुळे राज्यातील जाहीर 92 नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. नवीन सरकारने तातडीने याबाबत कार्यवाही केली पाहिजे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली होती.                                                                                                                              

            पंकजा मुंडे यांनी देखील ओबीसी राजकीय आरक्षणासहीत निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका मांडली होती. ,"काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. बीड जिल्ह्यातील बीड, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ गेवराई, किल्ले धारुर या नगरपालिकांची निवडणूक होत आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने