आपल्या देशामध्ये तेल इंधनावर सोळा लाख कोटीची आयात होत असून हा खर्च कमी करण्यासाठी बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन याचा अत्याधिक उपयोग होणे आवश्यक आहे. सोलर उर्जेचे सहाय्याने ग्रीन हायड्रोजन निर्मिती झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल . ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून ग्रीन हायड्रोजन बायोमासपासून तयार होत असल्याने शेतकऱ्यांनीच या ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले . ऑल इंडिया रिन्युवेबल एनर्जी असोसिएशनच्या नागपूर मुख्यालयाच्या स्थापना समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण -महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीकरणीय ऊर्जा मध्ये सौर उर्जेचे योगदान महत्वाचे असून उर्जा बास्केटमध्ये 40 टक्क्यांहून जास्त योगदान तसेच 250 गीगा वॅटची क्षमता सोलर ऊर्जेत आहे यातून 7 लाख 80 हजार करोडची गुंतवणुक तसेच रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे सोलर कुकर तसेच सौर चुल यासारख्या उपक्रमांची सुरुवात केली जात आहे. महावितरण कंपन्यांच्या वितरणामध्ये 10 लाख कोटी पेक्षा जास्त डिस्ट्रीब्यूशन लॉसेस होत असल्याने वीज प्रीपेड कार्ड सारखी व्यवस्था आणण्याची योजना केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे असे त्यांनी सांगितलं. उद्योजक सोलर रूफ पॅनल च्या सहाय्याने वीज वापरतात त्यांना वीज बिलात अनुदान मिळेल अशी योजना केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने तयार केली होती परंतु त्याला वितरण कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे सांगून वीज वितरण कंपन्यानी अनुदान देण्यासंदर्भात केंद्रीय कायदा आणण्याचा सुद्धा सूतोवाच त्यांनी केलं. सोलर विजेपासून सार्वजनिक स्थळावर तसेच सार्वजनिक परिवहन व्यवस्था संचलित केल्यास वीजेची बचत होईल. सौर ऊर्जेचा वापर महा मेट्रो नागपूर सुद्धा करत आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.
|
टिप्पणी पोस्ट करा