श्रीलंकेत आता कोणाचे सरकार ? वाचा



      ब्युरो टीम : गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेच्या चुकीच्या हाताळणीबद्दल नागरिकांच्या रोषाला तोंड देणारे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार येत्या बुधवारी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्यावर काल,रविवारी प्रमुख विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले. तसा निर्णय प्रमुख विरोधी पक्षांच्या विशेष बैठकीत घेतला गेला आहे.

       'काही कालावधीसाठी सर्व पक्षांच्या सहभागासह सरकार स्थापन करण्याला आम्ही तत्त्वत: सहमती दर्शवली आहे,' असे सत्ताधारी पोदुजाना पेरामुना पक्षाच्या (एसएलपीपी) फुटीर गटाचे विमल वीरावांसा यांनी सांगितले, तर १३ जुलैला राजपक्षे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचे मत याच गटाचे आणखी एक नेते वासुदेव नानायक्करा यांनी व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीत सर्वपक्षीय सरकार स्थापण्याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे मुख्य विरोधी पक्ष समगी जन बालवेगया (एसजेपी) पक्षाकडून सांगण्यात आले. 'काही कालावधीसाठी सर्व पक्षीय अंतरिम सरकार स्थापण्यात येईल व नंतर संसदीय निवडणूक घेतली जाईल,' असे 'एसजेबी'चे सरचिटणीस रंजित मदुमा बंडारा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने