उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मागितली खास भेट

ब्युरो टीम :  'वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल, तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या,' असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केले.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठ ऑगस्टपर्यंत शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे सर्वाधिक समर्थन असल्याबाबतचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले. २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याचाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, 'मला वाढदिवसाला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचे कारण आता 'त्यांनी' व्यावसायिक संस्था कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसाविरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात, तरी हे माझे शिवसैनिकांचे वैभव त्यांना पुरून उरेल,' असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला दिला.
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांपाठोपाठ खासदारांवर कारवाईचा सपाटा सुरूच असून, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह एक जिल्हा प्रमुख, दोन उपजिल्हा प्रमुख आणि तीन तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

शिवसेनेच्या आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले; मात्र एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांनाही गळाला लावले. बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांपाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हेदेखील शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेकडून ज्या बंडखोरांवर कारवाई होत आहे, त्यात आता जाधव यांचाही समावेश झाला असून. त्यांचीही हकालपट्टी करण्यात करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मधून जाहीर करण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने