एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत संतापले, म्हणाले ....

ब्युरो टीम : नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत प्रश्न विचारताच ते चांगलेच संतापले.  काही महत्वाच असेल तर विचारा, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी काल एक वक्तव्य केलं आहे, तसंच विधिमंडळात शिंदे आणि फडणवीस यांच्यात समन्वय दिसून आला, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असे काही प्रश्न पत्रकारांकडून संजय राऊत यांना विचारण्यात आले. हे प्रश्न विचारताच संजय राऊत हे काहीसे संतापल्याचं पाहायला मिळालं. 'मी अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही, आता नव्या सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे, त्यामुळे तो विषय आमच्यासाठी संपला आहे, काही महत्त्वाचं असेल तर विचारा,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळणाऱ्या संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मात्र प्रतिक्रिया दिली आहे. 'बंडखोर आमदार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांना ईडीकडून दिलासा मिळत आहे. नुकताच एकाला जामीन मिळाल्याचं मी पाहिलं. या लोकांवर चुकीचे आरोप झाले होते. खासदार भावना गवळी यांच्या एका निकटवर्तीयाला जामीन मिळाला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, मात्र याचं जे टायमिंग आहे ते गमतीशीर आहे,' असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष तीव्र झाला असल्याचे दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने