ब्युरो टीम: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) टेलीफोन एक्सचेंज मधील सुरक्षारक्षकाचा खून करण्यात आला आहे. एक्सचेंज मधील वायरी व केबल चोरणार्यांनी खून केल्याची फिर्याद सुरक्षारक्षकाच्या मुलाने दिली आहे.
दौंड मुख्य टपाल कार्यालयाच्या मागील बीएसएनएल एक्सचेंज च्या आत सुरक्षारक्षक बाबूसेठ उर्फप्रकाश ठाकूरदास सुखेजा (वय ६०, रा. बीएसएनएल स्टाफ क्वॅार्टर्स, दौंड ) या सुरक्षारक्षकाचा खून करण्यात आला आहे. मध्यरात्री दोन ते सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. प्रकाश सुखेजा यांचा मुलगा मनोज याने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री अडीच वाजता त्यांचे वडील रक्तबंबाळ अवस्थेत एक्सचेंजच्या मागे असलेल्या सदनिकेत आले. त्यांनी ` एक्सचेंज मधील वायरी व केबल चोरट्यांनी चोरल्या असून त्यांनी माझ्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून जखमी केले आहे. त्यांच्या हातात हत्यारे आहेत, तुम्ही घराबाहेर निघू नका `असे म्हणाले. मनोज याने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली परंतु त्या दरम्यान प्रकाश सुखेजा यांना रक्ताची उलटी झाल्यानंतर ते बेशुध्द झाले. दौंड पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून सर्व शक्यता पडताळून तपास केला जात आहे. बंदिस्त असलेल्या एक्सचेंजच्या आतील प्रवेशद्वाराचे कडी - कोयांडे तोडण्यात आले आहेत. मृत प्रकाश सुखेजा यांचे दौंड शहरातील गोवा गल्ली येथे किराणा दुकान होते मात्र कालांतराने त्यांनी ते बंद केले होते. बीएसएनएल मध्ये कंत्राटी पध्दतीवर सुरक्षारक्षक म्हणून मागील सात वर्षांपासून कार्यरत होते.
टिप्पणी पोस्ट करा