हवामान खात्याकडून दिले जाणारे ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या


ब्युरो टीम : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुण्यासह कोकणातही मुसळधार पाऊस बरसतोय. त्यातच हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांना  यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण तुह्माला माहिती आहे का,  ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्सचा अर्थ…

रेड अलर्ट 

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एकाद्या विशिष्ट प्रदेशातील (राज्य, शहर, तालुका, जिल्हा) नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते. हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं अपेक्षित असतं. अधिक धोकादायक आणि तिव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली, परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट 

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो.. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

यलो अलर्ट 

पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो.. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ग्रीन अलर्ट 

कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्यपणे यल्लो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर केला जातो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने