कोण होणार श्रीलंकेचा काळजीवाहू अध्यक्ष ?



          ब्युरो टीम : श्रीलंकेत सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्यावर काल,रविवारी प्रमुख विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले. तसा निर्णय प्रमुख विरोधी पक्षांच्या विशेष बैठकीत घेतला गेला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा काळजीवाहू अध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चा सुरू झाली असून याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती समोर  आली आहे. 

         श्रीलंकेच्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत सभापती महिंदा यापा अबेयवर्धने हे काळजीवाहू अध्यक्ष असतील. त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी खासदारांमध्ये निवडणूक होणे आवश्यक आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, असे त्यांनी शनिवारी जाहीर केले आहे. सर्वपक्षीय सरकार स्थापन होऊन या सरकारने संसदेत बहुमत सिद्ध केल्यानंतर विक्रमसिंघे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील. तोपर्यंत ते पंतप्रधानपदी कायम राहतील, असे पंतप्रधानांच्या माध्यम विभागाने म्हटले आहे.

        दुसरीकडे, श्रीलंकेतील सरकारविरोधी निदर्शकांनी अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानांवरील ताबा काल, रविवारीही कायम ठेवला होता. राजपक्षे यांचा ठावठिकाणा अद्याप समोर आलेला नाही. आंदोलकांचा मोर्चा नियंत्रणाबाहेर जाईल, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर, त्यांनी शुक्रवारी रात्रीच निवासस्थान सोडले. त्यानंतर ते कुठे गेले, हे अद्यापही समजू शकलेले नाही. निवासस्थान सोडल्यांतर राजपक्षे यांनी केवळ सभापती महिंदा यापा अबेयवर्धने यांच्याशी संपर्क साधून, बुधवारी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने