ब्युरो टीम: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता सत्तेत आलेल्या भाजपने पुन्हा एकदा मिशन लोटस सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता विधान परिषदेची निवडणूक जिंकून पुन्हा सभापतीपदी विराजमान झालेले रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. एका भाजप नेत्याने याबाबतचे संकेत दिले असून, अनेक जण रांगेत असल्याचा दावा या नेत्याने केला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत रामराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादीचे खळ उठवले आहे, वस्ती उठायला वेळ लागणार नाही, आता बोरा बिस्तरा गुंडाळायला जास्त वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपमध्ये येण्यासाठी मोठी रांग लागली आहे. त्यामुळे सब कतार मै है, योग्य टायमिंग आल्यावर ते कार्यक्रम करतात. ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना सोबत घेऊ, असे सूचक विधान त्यांनी केले.
दरम्यान, रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९वे वंशज आहेत. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत. नार्वेकर सध्या विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान आहेत. विधानपरिषदेच्या सभापतीपदी सासरे, तर विधानसभा अध्यक्षपदी जावई अशी जोडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जावयापाठोपाठ सासरेही भाजपमध्ये येणार का, याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
टिप्पणी पोस्ट करा