राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित; दोन दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई


ब्युरो टीम
: पावसाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे मंगळवारी (ता. २६) राज्यसभेतील १९ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी (ता. २५) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्यामुळे आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संसदेत विरोधक सातत्याने आंदोलन करीत आहेत. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला जात होता.
राज्यसभेत  गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित  केलेल्या खासदारांपैकी सात खासदार हे टीएमसी पक्षाचे आहेत.

सोमवारी काँग्रेसचे खासदारांना निलंबित

सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांना हंगामासाठी निलंबित करण्यात आले.



काँग्रेसचा संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ

ईडीने मंगळवारी सोनिया गांधी यांची चौकशी केली. ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसने  संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ केला. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला तर काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. याठिकाणी राहुल गांधीही धरणावर बसले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने