ब्युरो टीम: राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहे. या दोघांच्या मंत्रिमंडळाकडूनच राज्यातील प्रश्नांवर निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्यात नवं सरकार स्थापन करून चार आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. तरी राज्यात शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
'दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यग्र आहेत आणि दुसरीकडे राज्याला दिव्यांग करुन सोडलं आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले, 'गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यग्र आहेत आणि दुसरीकडे राज्याला दिव्यांग करून सोडलं आहे'. पुढे पाटील म्हणाले, 'राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही. ज्याअर्थी करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोक जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे'.
'या राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न आज सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पुरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे, त्या भागात पालकमंत्री नाही. फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. परंतु त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
'राज्यात पुरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने प्रत्येक जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा