नानांचा शिंदे सरकारवर घणाघात, राज्यात 'आरे' वरून 'कारे'!

ब्युरो टीम : 'आरे मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी व मुंबईकर यांचा तीव्र विरोध आहे. कारशेड आरेमध्ये होऊ नये यासाठी मुंबईकर व हजारो पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. परंतु, पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे,' अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 
'एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजपा प्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे,' असे सांगतानाच पटोले पुढे म्हणाले,'आरे येथील कारशेडला मुंबईकरांचा विरोध होणार हे माहीत असतानाही कारशेडसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तलही करण्यात आली. विकास कामाला आमचा विरोध नाही. मुंबई मेट्रो प्रकल्पालाही विरोध नाही. मुंबईतील दळणवळणाचा विचार करून मेट्रो प्रकल्प करण्याचा निर्णय सर्वात प्रथम काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाच घेतला होता.'
दरम्यान,  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आरेचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका, अशी विनंतीच ठाकरे यांनी राज्य सरकारला केली होती. मात्र, संध्याकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची विनंती फेटाळून लावली आहे. त्यातच नाना पटोले यांनीही आरे प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने