ब्युरो टीम : 'बाळासाहेब आमच्यासाठी तेजस्वी नेते होते. गुरुमध्ये तेज असलं पाहिजे; जे आपले भक्त, शिष्य, समर्थकांना दिशा देईल. ते सर्व बाळासाहेबांमध्ये होतं. आमच्यासारखे लाखो शिवसैनिक त्यांना गुरु मानत होते. राज्य आणि देशातील लोकांनीही त्यांना गुरुस्थानी ठेवलं होतं. निष्ठेच्या बंधनाने बाळासाहेबांनी सर्वांना एकत्र ठेवलं होतं,' असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
'बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं, असे सांगतानाच राऊत यांनी बंडखोर आमदारांवर देखील टीका केली आहे.
'बाळासाहेब आमच्या सर्वांचे गुरु होते. ज्यांची शिवसेनेवर, महाराष्ट्रावर, देशावर अढळ निष्ठा आहे त्या सर्वांसाठी बाळासाहेब गुरु होते. त्यांनी आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केलं. गुरु मोकळ्या हाताने देत असतो, तसंच बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने, मनाने उधळण केली. असा गुरु होणे नाही. ते एका अर्थाने महाराष्ट्राचे आणि देशाचेही गुरु होते. प्रत्येक दिवशी आमच्या गुरुचं स्मरण होत असतं. आजच्या दिवशी विशेष होत आहे, कारण काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेब गुरु आहेत सांगत आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेणं गरजेचं आहे,' असेही ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा