ठाकरेंची विनंती फडणवीस यांनी फेटाळली, आरे बाबत म्हणाले..

ब्युरो टीम : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आरेचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका, अशी विनंतीच ठाकरे यांनी राज्य सरकारला केली होती.
दरम्यान, संध्याकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची विनंती फेटाळून लावली आहे. “यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊच. उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान राखून मला असं वाटतंय की कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचं हित हेच आहे की जिथे कारशेड २५ टक्के तयार झालंय, तिथेच ते १०० टक्के तयार व्हावं, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
आरेमधील जंगल वाचवण्यासाठी हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, आता हा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने फिरवला असून हे कारशेड कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला केलेलं आवाहन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने