जयंत पाटलांचे मोठे विधान, म्हणाले सरकार फार काळ टिकणार नाही


ब्युरो टीम : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप २४ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे, की हा प्रासंगिक करार आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय २०२४ आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल.” 
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णा लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. मात्र, अद्यापही तापलेले राजकीय वातावरण शांत होताना दिसत नाही. सत्ताधारी व विरोधक यांच्या मध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा नव्याने सुरू होत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने