मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेच्या अडचणीत वाढ, CBIकडून गुन्हे दाखल


ब्युरो टीम:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, अन्वेषण विभागाने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण, तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात एनएसईच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याच्या आरोपांखाली नवे गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्या घराचीही झडती घेतली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने हे गुन्हे नोंदवले आहेत. सीबीआयने या प्रकरणात मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमधील जवळपास दहा ठिकाणी छापे मारले असून, संजय पांडेंशी संबंधित मालमत्तांचा तपास केला जात आहे. 
१९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. ते नुकतेच म्हणजे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या तीन दिवसांनंतरच ईडीने त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते.
संजय पांडे  यांनी चित्रा रामकृष्ण प्रकरणात एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. ती कंपनी पांडे यांची होती. सीबीआयकडून २०१८ पासून एनएसईच्या लोकेशन स्कॅमची चौकशी केली जात आहे. यापूर्वी, संजय पांडे यांची मार्चमध्ये सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. संजय पांडे यांची सीबीआयने त्यावेळी तब्बल सहा तास चौकशी केली होती. ही चौकशी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने मार्च २०२२ मध्ये संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. हेमंत नगराळे यांच्यानंतर पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तपद गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणांमुळे कायम चर्चेत राहिले आहे.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने