भारीच ! DRDO संचलित स्वयंचलित विमानाचे उड्डाण यशस्वी

ब्युरो टीम :  डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारा संचालित  स्वयंचलित उड्डाण तंत्रज्ञान मार्गदर्शक विमानाचे कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील हवाई चाचणी तळावरून झालेले प्रथम उड्डाण यशस्वी झाले आहे. संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने विमानाने उड्डाण, अचूक दिशादर्शन यांच्यासह अत्यंत हळुवारपणे जमिनीवर उतरून एका परिपूर्ण कामगिरीचे दर्शन घडविले आहे. या विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे, भविष्यात मानवरहित विमानांच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या बाबतीत एक प्रमुख टप्पा गाठला असून अशा धोरणात्मक संरक्षणविषयक तंत्रज्ञानांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
बेंगळूरूमधील एयरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टब्लिशमेंट या डीआरडीओच्या प्रमुख संशोधन प्रयोगशाळेने या मानवरहित विमानाचे संरेखन आणि विकसन केले आहे. त्यामध्ये एक लहान  टर्बोफॅन इंजिन बसविलेले असून या विमानाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेली सर्व सामग्री तसेच यात बसविलेल्या सर्व यंत्रणा संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. ते  म्हणाले की, स्वयंचलित विमानांच्या निर्मितीच्या संदर्भात मिळालेले हे मोठे यश असून, यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणांच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर भारता’ची उभारणी करण्याचा मार्ग यातून मिळेल.

डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन तसेच विकास विभागाचे सचिव डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी या विमानाचे संरेखन, विकास तसेच चाचण्या यांच्यात सहभागी झालेल्या पथकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने