‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा


राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि अकोला तालुक्यात

उपक्रमाची तयारी प्रगतीपथावर

                   शिर्डी:, भारतीय स्‍वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्‍याच्‍या  पार्श्‍वभूमीवर जनतेच्‍या मनात या स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या स्‍मृती तेवत राहाव्‍यात, स्‍वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्‍वातंत्र्य संग्रामात घडलेल्‍या विविध घटना यांचे स्‍मरण व्‍हावे, देशभक्‍तीची जाज्‍वल्‍य भावना कायम स्‍वरूपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव राज्‍यभरात राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून 13 ते 15 ऑगस्‍ट, 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्‍या सूचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राज्‍यासह जिल्‍ह्यात उत्साहात राबविण्‍यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांच्यावतीने यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 08 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा

अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 02 हजार 761  इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 7 लाख 80 हजार 577 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 19 हजार 89  लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत. 

राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि अकोला तालुक्यात उपक्रमाची तयारी प्रगतीपथावर

   तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली असून शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, बचत गट कार्यकर्ते, ग्रामसेवक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून मोहिमेची तयारी जोरात सुरु आहे.

      राहाता तालुक्यात सुमारे 53 हजार 696 कुटुबांना राष्ट्र ध्वज पुरविण्यात येणार आहे. गट विकास अधिकारी यांच्याकडून तालुक्यात जवळपास 40 हजार ध्वज वाट करण्यात येणार असून, 13 हजार ध्वज प्रवरा शिक्षण संस्थेकडून पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमासोबतच अमृत पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी दिली.

      श्रीरामपूर तालुक्यात सुमारे 31 हजार कुटुब या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यासाठी तालुका प्रशासनाला जवळपास 20 हजार ध्वज प्राप्त झाले असून उर्वरित ध्वज लवकरच प्राप्त होणार असून त्याच्या वितरणाचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती गट विकास अधिकारी मच्छिंद्र धास यांनी दिली.

     कोपरगांव तालुक्यात 50 हजार 76 कुटुबांना ध्वज पुरविण्यात येणार आहेत. 7 ऑगस्ट पर्यत ध्वज प्राप्त होणार असून, 11 ऑगस्टपर्यत ध्वज वितरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

      संगमनेर तालुक्यात 82 हजार 459 कुटुंब असून या कुटुंबांना प्रशासनाच्यावतीने ध्वज पुरविण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 25 हजार ध्वज प्राप्त झाले असून उर्वरित ध्वजांचा पुरवठा लवकरच करण्यात येणार असून प्राप्त झालेल्या ध्वजांचे वितरण सुरु करण्यात आले असल्याची माहिती गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली.

           अकोले तालुक्यात 56 हजार कुटुंब असून आतापर्यत 18 हजार ध्वज तालुका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील 146 ग्रामपंचायतीमार्फत या ध्वजांचे वितरण करण्यात येणार असून उर्वरित ध्वज वितरणाचे नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती गट विकास अधिकारी राहूल शेळके यांनी दिली.

         ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका, गाव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील. वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

000

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने