ऑटोग्राफ साइन करणं महाग पडलं; दिग्गज खेळाडूच 56 लाखांच घड्याळ चोरीला


 मुंबई: स्पेनचा दिग्गज फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना आणि त्यांच्या खेळाडूंसाठी मागची एक-दोन वर्ष बिलकुल चांगली गेलेली नाहीत. क्लब या काळात कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. क्लब मध्ये बरेच बदल सुरु आहेत. क्लबला अनेक मोठ्या खेळाडूंना सोडावं लागलं. त्यात आता जे जॉइन करतायत, त्यांची सुरुवातही फारशी चांगली झालेली नाही. यापैकीच एक आहे, पोलंडचा  सुपरस्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेवांदोव्स्की.  जो याच सीजन मध्ये क्लब मध्ये दाखल झाला. लेवांदोव्स्की बार्सिलोना क्लबचा भाग बनल्यानंतर त्याला 56 लाख रुपयांच घड्याळ गमवावं लागलं.

     लेवांदोव्स्की याआधी जर्मनीचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब बायर्न म्युनिखकडून खेळायचा. बार्सिलोनात दाखल झाल्यानंतर लेवांदोव्स्कीला पहिलाच जोरदार झटका बसला. नव्या क्लबच्या नव्या फॅन्स मध्ये मिसळताना, त्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात लेवांदोव्स्कीचं महागडं घड्याळ चोरीला गेलं. बार्सिलोनाच्या प्रॅक्टिस सेंटर बाहेर हे सर्व घडलं. लेवांदोव्स्की फॅन्सना ऑटोग्राफ देत असताना, त्याचं 56 लाखांच घड्याळ चोरीला गेलं.

ऑटोग्राफ साइन करणं महाग पडलं

    स्पॅनिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेवांदोव्स्की 17 ऑगस्टला सराव करण्यासाठी क्लब मध्ये पोहोचला. त्यावेळी नेहमीप्रमाणे तिथे बार्सिलोनाचे चाहते उपस्थित होते. प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्या खेळाडूला भेटण्यासाठी हे चाहते उत्सुक होते. लेवांदोव्स्की सारखा स्टार आल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहते आतुर होते. पोलिश स्टारनेही त्यांना नाराज केलं नाही. मात्र त्याचवेळी त्याला झटका बसला.

गपचूप कारचा दुसरा दरवाजा उघडला

     चाहत्यांमध्येच एक चोर लपून बसला होता. ज्याने गपचूप कारचा दुसरा दरवाजा उघडला आणि लेवांदोव्स्कीची 70 हजार युरोची म्हणजे 56.14 लाख रुपयांच महागडं घड्याळ घेऊन पसार झाला. लेवांदोव्स्कीला या प्रकाराने धक्का बसला. त्याने चोराचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही. या प्रकारानंतर स्थानिक पोलिसांनी लागलीच पावलं उचलली. त्यांनी आरोपीला पकडून त्याच्याकडून घड्याळ ताब्यात घेतलं. यामुळे लेवांदोव्स्कीचं मोठ नुकसान टळलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने