मान्यताप्राप्त स्टार्ट-अपला स्वदेशी 5G टेस्ट बेड मोफत वापरायला मिळणार.

 

भारतात 5G परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने आणि आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, केंद्र सरकारने सरकार मान्यताप्राप्त स्टार्ट-अप आणि एमएसएमईसाठी पुढील सहा महिन्यांकरिता  जानेवारी 2023 पर्यंत स्वदेशी 5G टेस्ट बेड  मोफत वापरायला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

इतर सर्व हितधारकांसाठी अगदी नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व 5G हितधारकांना म्हणजे उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा प्रदाते, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था,  उपकरणे उत्पादकांना त्यांच्या  नेटवर्कमध्ये जलद विकास आणि  उत्पादने तैनातीसाठी 5G टेस्टबेड सुविधा आणि कौशल्य वापरण्याचे आवाहन केले आहे.  इच्छुक 5G टेस्ट बेड वापरण्यासाठी वेब पोर्टल https://user.cewit.org.in/5gtb/index.jsp द्वारे अर्ज करू शकतात.

भारताच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आणि 5G वापरात अग्रेसर राहण्यासाठी  दूरसंचार विभागाने  मार्च, 2018 मध्ये भारतात 'स्वदेशी 5G टेस्ट बेड' स्थापित करण्यासाठी बहु-संस्थात्मक  सहकार्य प्रकल्पासाठी 224 कोटी रुपये खर्चासह आर्थिक अनुदान मंजूर केले. या प्रकल्पातील आठ सहयोगी संस्था -  आयआयटी मद्रास, आयआयटी  दिल्ली, आयआयटी  हैदराबाद, आयआयटी मुंबई , आयआयटी  कानपूर, आयआयएससी बंगळुरू , सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी, या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2022 रोजी स्वदेशी 5G टेस्ट बेड राष्ट्राला समर्पित केले होते. टेस्ट बेडच्या   वापरासाठी एक वेब आधारित पोर्टल (https://user.cewit.org.in/5gtb/index.jsp) देखील विकसित केले आहे. 

या स्वदेशी टेस्ट  बेडचा विकास  5G तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि 5G आत्मनिर्भर भारताकडे नेणारा  महत्त्वाचा टप्पा आहे. हे टेस्ट बेड भारतीय स्टार्ट-अप, एमएसएमई , शैक्षणिक आणि उद्योग वापरकर्त्यांद्वारे विकसित आणि उत्पादित  5G उत्पादनांच्या चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी स्वदेशी क्षमता पुरवते.  यामुळे खर्चात कपात  आणि डिझाइनचा वेळ कमी झाला आहे ज्यामुळे भारतीय 5G उत्पादने जागतिक स्तरावर बाजारपेठेत स्पर्धात्मक बनतील अशी अपेक्षा  आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने