ब्युरो टीम: वसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खा. संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी रात्री मध्यरात्री अटक केली. त्यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी 1 हजार कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने रविवारी राऊतांच्या भांडुप स्थित निवासस्थानी धाड टाकली. त्यात सुमारे साडे 11 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. आता या रकमेच्या नोटांच्या बंडलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचा धक्कादायक खुलासा माध्यमांनी केला आहे.
10 लाखांच्या बंडलांवर शिंदेंचे नाव
DNA च्या वृत्तानुसार, ईडीने संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यातून साडे 11 लाखांची रोख रकम जप्त केली. यातील 10 लाखांच्या बंडलाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
सुनिल राऊतांचे स्पष्टीकरण
10 लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलांवर शिवसेनेचे बंडखोर आमदार व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा वेगळ्या अंगाने तपास केला जाईल, असा दावा केला जात आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी जप्त करण्यात आलेली रकम अयोध्या दौऱ्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.
मॅरेथॉन चौकशीनंतर अटक
ईडीने रविवारी सकाळीच संजय राऊतांच्या घरी धाड टाकली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातून महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले. त्यानंतर अधिकारी राऊतांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेले. त्यानंतर मध्यरात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली असून, राज्यातील अनेक शहरांत शिवसैनिक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यामुळे सर्वत्र मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शिवसेनेला धक्का
मुंबईतील 1034 कोटी रुपयांच्या कथित पत्राचाळ भूखंड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED)रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. यातून त्यांच्यातील एक कट्टर शिवसैनिक अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. पण आता ईडीने त्यांनाच ताब्यात घेतल्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
टिप्पणी पोस्ट करा