मुंबई: राज्यात
सत्तांतर झाल्यानंतर जवळपास सव्वा महिना रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या
माहितीनुसार, एकनाथ शिंदे
मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. भाजपकडून आठ तर शिंदे गटाकडून सात सदस्य
शपथ घेणार आहेत.
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्य
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व शिवसेनेतील शिंदे गटाचं सरकार आलं आहे.
नव्या सरकारच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला.
मात्र, त्यानंतर महिना उलटूनही
मंत्रिमंडळ बनत नव्हते. हे सरकारच बेकायदा असल्याचं सांगत शिवसेना सर्वोच्च
न्यायालयात गेली आहे. शिवसेनेच्या विविध याचिकांवरील निकाल सातत्यानं लांबणीवर पडत
आहे. त्यामुळं भाजप हायकमांडनं 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली होती आणि मंत्रिमंडळ विस्तारही
रखडत गेला. मात्र, याच मुद्द्यावरून
विरोधकांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस
यांनी पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांचं मन वळवल्याचं समजतं.
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळं जनतेबरोबरच आमदारांमध्येही असंतोष असल्याचं
वरिष्ठांना सांगण्यात आलं. त्यानंतर विस्तारास मंजुरी मिळाल्याचं समजतं. त्यानुसार
उद्या हा विस्तार होत आहे.
राज्यात सरकार सत्तेवर असल्यानं पावसाळी
अधिवेशन घेण्याची गरज आहे. मात्र, त्याचवेळी १२
तारखेच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवारही डोक्यावर असल्यामुळं हा
विस्तार छोटेखानी असल्याचं समजतं. सध्या केवळ १५ मंत्री शपथ घेणार आहेत.
न्यायालयाच्या निकालानंतर इतर मंत्र्यांना सामावून घेतलं जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत जुन्या
मंत्र्यांना फारच कमी संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना लॉटरी
लागणार आहे. मंत्रिपदाच्या नावांवरून वाद होऊ नये म्हणून तूर्त वादग्रस्त
आमदारांना बाजूला ठेवलं जाणार आहे. टीईटी घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार यांचं
नाव यादीतून मागं पडल्याचं बोललं जात आहे.
कोणाला संधी मिळणार?
भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार,
प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण व अमरीश पटेल यांच्या नावांची चर्चा आहे. तर,
शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय राठोड, शंभुराज देसाई,
बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत.
मंत्र्यांची नावं अद्याप ठरलेली नाहीत - एकनाथ
शिंदे
मंत्र्यांची नावं अद्याप
ठरलेली नाहीत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ही नावं निश्चित होतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर
त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा