ब्यूरो टीम: राज्यात सध्या अतिशय घाणेरडे राजकारणं सुरू असून, सध्या राज्यात केवळ दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे, असा घणाघात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात केला आहे. कुडाळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग येथील निष्ठा यात्रेदरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्र कधीच गद्दारी खपवून घेत नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यातील हे नाट्य दीड ते दोन महिन्यांचं असून, हे गद्दार सरकार कोसळणारच आहे. येथील चिपी विमानतळाचा पाठपुरावा उद्धव ठाकरेंनी केला. मात्र, काही लोकं कामाचं श्रेय घेण्यासाठी पुढे आले मात्र, सर्वांना माहिती आहे की याचं काम कुणी केलं आहे.
सध्या राज्यात विकास कामांकडे कोणत्याच नेत्याचं लक्ष नसून, सत्तेतील सरकार केवळ आणि केवळ घाणेरडे राजकारण करण्यात व्यस्त आहे. उद्धव ठाकरे प्रत्येकाचे मुख्यमंत्री होते. हे सरकार बेईमान असून, हे तात्पुरतं बेईमान गद्दार सरकार लवकरच पडेल असे ते म्हणाले. करण्यात आलेली ही गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत नव्हे तर, माणुसकीसोबत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांवरदेखील हल्लाबोल केला. सध्या राज्यात एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे काम राज्यपाल करत असल्याचे ते म्हणाले.
कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कळत नाही
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, तो कधी होईल याची कुणालाच कल्पना नसून, राज्यात सध्या केवळ दोनचं लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आहे. मात्र, यात नेमकं कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या परवानगीसाठी यांना दिल्लीला जावं लागतंय असा टोलादेखील त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी गद्दारी करण्यापूर्वी सर्व आमदार खुल्याने फिरत होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळी या सर्वांना एका बसमधून डांबून आणले गेले. त्यावेळी या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता होती.
टिप्पणी पोस्ट करा