मुंबई : १९९० च्या दशकात ठाण्यातील १६ डान्स बार
फोडल्याचे विधानसभेतील आपल्या भाषणात तुम्ही जाहीर केले होते. आता मात्र तुमच्या
ठाण्यातील घराच्या शेजारीच मोठय़ा प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत. माध्यमांनी
चित्रफीतही दाखवल्यानंतर त्याच्यावर पोलिसांना कारवाई केली, याकडे लक्ष वेधत ठाण्यात डान्स बार सुरू
असल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत
प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर
विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. सत्तांतरानंतर विश्वासदर्शक ठरावानंतर
मुख्यमंत्री या नात्याने बोलताना ठाण्यातील डान्स बार फोडले होते आणि त्यामुळे
गुंडांनी लक्ष्य केले होते. केवळ आनंद दिघे यांच्यामुळे वाचलो, असे आपण म्हणाला होता, याची आठवण अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
करून दिली. त्या वेळी डान्स बार फोडले होते. मग आता ठाण्यात तुमच्या घराच्या
जवळपास मोठय़ा प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत. हा काय प्रकार आहे, असा सवाल करत कारवाई झालेल्या डान्स बारची नावे
अजित पवार यांनी वाचून दाखवली.
मंत्रिमंडळामध्ये २० लोकांना संधी दिली; पण एकाही महिलेला स्थान दिले नाही. ही राज्यासाठी लाजिरवाणी
बाब आहे, असा टोलाही लगावला.
जयंत पाटील यांचा एकनाथ
शिंदे यांना प्रस्ताव
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना
मुख्यमंत्री केले आहे, असे चंद्रकांत
पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भाजपने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना
मुख्यमंत्री केले असेल तर मनावर कुठलाही दगड न ठेवता, आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ.
तुम्ही पुन्हा आमच्यासोबत या, तुमच्यातील गुण
पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही, असा मिश्कील टोला जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना
लगावला
टिप्पणी पोस्ट करा