वैध आयएसआय चिन्ह नसलेल्या आणि अनिवार्य भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी करण्यापासून ग्राहकांना सावध करण्यासाठी आणि खबरदारी घेण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कायद्याच्या कलम 18(2)(जे ) अंतर्गत सुरक्षाविषयक सूचना देखील जारी केल्या आहेत.हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या संदर्भात पहिली सुरक्षा सूचना जारी करण्यात आली होती तर दुसरी सुरक्षा सूचना, पाण्यात बुडवून पाणी गरम करणारे विद्युत वॉटर हीटर्स, शिलाई मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एलपीजीसह घरगुती गॅस स्टोव्ह इत्यादींसह घरगुती वस्तूंबाबत जारी करण्यात आली होती.
ई-वाणिज्य मंचावर विहित केलेल्या अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी देऊन ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल ॲमेझॉन या ई-वाणिज्य मंचाच्या विरोधात मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अलीकडेच आदेश पारित केला आहे. ई- वाणिज्य मंचावर अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ई-वाणिज्य मंचांच्या विरोधात स्वतःहून कारवाई सुरु केली होती. प्राधिकरणाने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट ,पेटीएम मॉल , शॉपक्लुज आणि स्नॅपडील या प्रमुख ई-वाणिज्य मंचांना तसेच या मंचावर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या.
कंपनीने दिलेल्या प्रतिसादानंतर केलेल्या परीक्षणात असे निरीक्षणास आले की, क्यू सी ओ (QCO)च्या सूचनेनंतर ॲमेझॉन च्या माध्यमातून आपली अनिवार्य मानके पूर्ण न करणाऱ्या 2,265 प्रेशर कुकरची विक्री केली गेली आहे . ॲमेझॉन ने आपल्या मंचावरून अशा प्रकारचे प्रेशर कुकर विकून एकूण 6,14,825.41 रुपये एवढी रक्कम मिळवली आहे. यावर ॲमेझॉनने असे नमूद केले आहे की,आमच्या मंचावरून होणाऱ्या अशा प्रेशर कुकरच्या विक्रीसाठी आम्ही केवळ विक्री साठीची दलाली घेतो. यावर सीसीपीएने असे मत नोंदवले आहे की, ॲमेझॉन जेव्हा आपल्या ई-कॉमर्स मंचावर नोंदणी असलेल्या वस्तू विकतो आणि त्यातून व्यावसायिक नफा कमवतो तेव्हा एखाद्या वस्तूच्या विक्री बाबत समस्या निर्माण झाली तर ॲमेझॉन स्वतःला यापासून, अलिप्त ठेवू शकत नाही.
यासंदर्भात सीसीपीएन एक नोटीस काढून ॲमेझॉन ला निर्देश जारी केले आहेत की ,आपल्या मंचावरून विकल्या गेलेल्या 2,265 प्रेशर कुकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी, त्याचबरोबर असे प्रेशर कुकर गोळा करावेत आणि त्यांची किंमत ग्राहकांना परत करावी तसेच यासंबंधीचा आपला, कार्यवाहीचा अहवाल येत्या 45 दिवसांमध्ये दाखल करावा.आपल्या मंचावरून अशा प्रकारच्या प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी दिल्याबद्दल , तसेच क्यू सी ओ नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल कंपनीने दंड म्हणून 1,00,000 रुपये भरावेत असेही निर्देश देण्यात आले. पेटीएम मॉल विरोधात ही CCPAने अशाच प्रकारची दंडात्मक आणि सदोष प्रेशर कुकर परत मागून घेण्यासंदर्भात नोटीस पाठविली आहे.यात सीसीपीएने निर्देश दिल्याप्रमाणे दंडाच्या स्वरूपात 1,00,000 रुपये भरायचे आहेत.
|
टिप्पणी पोस्ट करा