जखमी गोविंदांवर होणार पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार!

 


ब्युरो टीम
: दहिहंडीवेळी किरकोळ अपघात झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात ही मागणी केली होती.

       सुनिल प्रभू म्हणाले होते, दहिहंडीमध्ये आम्ही पण गेली अनेक वर्षे गोविंदा म्हणून काम केलंय. मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना विमा लागू केला. पण किरकोळ मार लागेल त्यांना महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जे काही उपचार होतील ते सर्व मोफत करण्याचे निर्देश द्या. तसेच सराव शिबिर जिथं चालतात तिथे जे अपघात होतील तिथे देखील ज्यांना जास्त मार लागेल त्यांनाही विमा योजना लागू करा. तसेच ५ टक्के गोविंदांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. पण इतर क्रिडा प्रकारातील ५ टक्के बॅकलॉग आहे, तो पण लवकरात लवकर पूर्ण करा.

       प्रभू यांच्या निवदेनावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्या दहिहंडीवेळी ज्या गोविंदांचा अपघात होईल त्यांच्यावर महापालिका आणि शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतील, याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच सराव शिबिराबाबत नोंद ठेऊन याबाबत पुढे कार्यवाही होईल.

----------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने