ब्युरो टीम: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर काल ईडीने धाड मारली. त्यानंतर राऊत यांची तब्बल 16 तास चौकशी केली. त्यानंतर राऊत यांना ईडीने रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या अटकेचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडसाद उमटले आहे. संसदेतही राऊत यांच्या अटकेचे पडसाद उमटले आहे. शिवसैनिकांनीही रस्त्यावर उतरून राऊत यांच्या अटकेचा निषेध करत राऊत एकटेच नसून आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलीला धीर देत शिवसेना तुमच्या पाठी खंबीरपणे असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे स्वत: घरी आल्याने राऊत यांच्या मातोश्रींना भरून आलं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र वायकर आदी नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलीला धीर देत घाबरू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या मातोश्री सविता राऊत यांचा हात घेत त्यांना धीर दिला. तसेच आम्ही सर्व या प्रकरणात लक्ष घालून आहोत. राऊतांसाठी कायदेशीर लढाई लढू, असंही उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना सांगितल्याचं समजतं.
मला संपवण्याचा प्रयत्न
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. पण आपण हरणार नाही, असंही ते म्हणाले. राऊत यांनी आज मीडियाशी अनौपचारिक बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांना काल दुपारी ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतरही त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री पावणे एकच्या सुमारास त्यांची अटक करण्यात आली. त्यानंतर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांना जेजे रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं. यावेळी राऊत यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केलं. राऊत यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. आपल्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी मीडियाशी थोडक्यात संवाद साधला. महाराष्ट्रात काय चाललंय हे तुम्ही पाहात आहातच. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.
कोर्टात हजर
दरम्यान, राऊत यांना आता कोर्टात आणण्यात आलं आहे. 3 वाजता कोर्टात युक्तिवाद सुरुवात होईल. सुमारे दोन तास कोर्टात सुनावणीस लागू शकतात. ईडी राऊतांच्या किती दिवसाच्या कोठडीची मागणी करतील हे पाहावं लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा