ब्युरो टीम: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. त्याठिकाणी संघाला आशिया चषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच संघात समावेश झालेला वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. त्यामुळे तो मालिकेत खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुंदरच्या जागी एका इंजिनिअरचा संघात समावेश केला आहे.
बीसीसीआयने अष्टपैलू शाहबाज अहमदचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शाहबाजला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे सध्या क्रिकेटपटू असलेला शाहबाज अभियंता आहे. वडिलांच्या हट्टापायी त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे.
शाहबाज २०२० पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. २७ वर्षीय शाहबाज अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.२८ सरासरीने धावा केल्या आहेत. तर, त्याची गोलंदाजी सरासरी ३९.२० इतकी आहे.
शाहबाजने आयपीएलमध्ये २९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १८.६ च्या सरासरीने आणि ११८.७२च्या स्ट्राईक रेटने २७९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने १३ बळी मिळवलेले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा