ब्युरो टीम : पाकिस्तानमधून सुरू असलेल्या एका यूटय़ूब वाहिनीसह आठ भारतीय यूटय़ूब वाहिन्या सरकारने गुरुवारी बंद केल्या. या वाहिन्यांद्वारे भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेविषयी सातत्याने अपप्रचार करण्यात येत होता.
बंदी घातलेल्या या वाहिन्यांना ११४ कोटी प्रेक्षकांनी पाहिले असून, त्यांचे ८५ लाख ७३ हजार सदस्य आहेत. या वाहिन्यांद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवले जात होते. माहिती तंत्रज्ञान नियम-२०२१ अंतर्गत या वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांवरून भारत सरकारने धार्मिक वास्तू पाडल्याचा, धार्मिक उत्सव साजरा करण्यावर बंदीच्या, भारतात धर्मयुद्ध जाहीर, असली खोटी माहिती सातत्याने प्रसृत केली जात असल्याचे सरकारी निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील धार्मिक सहिष्णुता, सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती. या वाहिन्यांवरून भारतीय सुरक्षा दले आणि जम्मू-काश्मीरविषयक खोटय़ा बातम्या पसरवल्या जात होत्या. हा सर्व आशय अतिशय चुकीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील व भारताच्या मैत्रीपूर्ण परराष्ट्र संबंधांना बाधा आणणारा होता, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा