अखेर शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात एकूण 18 मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजपआणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला विस्तार आहे. अधिवेशनानंतर अजूनही विस्तार करण्यात येणार आहे. अधिवेशनानंतर होणाऱ्या विस्तारात अपक्ष आमदार आणि महिला आमदारांना स्थान देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी आजच्या विस्तारात शिंदे-फडणवीस सरकारने सोशल इंजिनीयरिंग करत ओबीसी आणि मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या विस्तारात मराठा समाजातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तीन ओबीसी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, आदिवासी, दलित, मुस्लिम, मारवाडी आणि भटके विमुक्त समाजातील प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपचं ओबसी-मराठा कार्ड
आजच्या विस्तार छोटेखानी असला तरी भाजपने त्यातही ओबीसी-मराठा कार्ड खेळलं आहे. शिवाय दलित, आदिवासी आणि मारवाडी समाजालाही स्थान दिलं आहे. भाजपने चार मराठा, दोन ओबीसी आणि दलित, आदिवासी आणि मारवाडी समाजातील प्रत्येकी एकाला संधी दिली आहे. भाजपने मुंबईतून मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी दिली आहे. पण मुंबईतून एकाही मराठी आमदाराला मंत्रीपद देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिंदे गटाचं मराठा कार्ड
शिंदे गटानेही मराठा कार्ड खेळलं आहे. शिंदे गटाने आजच्या विस्तारात त्यांच्या कोट्यातून पाच मराठा मंत्री केले आहेत. तर ओबीसी, भटके विमुक्त आणि मुस्लिम समाजातून प्रत्येकी एकाला मंत्रीपद दिलं आहे. शिंदे गटानेही आजच्या विस्तारात एकाही आमदाराला स्थान दिलेलं नाही. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे गटाकडे मुंबईतून मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे आदींच्या नावाची चर्चा होती. पण त्यांनाही स्थान न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
समीकरणे बदलणार?
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मराठा आणि ओबीसी समाजातील मंत्र्यांना सर्वाधिक स्थान देण्यात आलं आहे. इतर घटकांचाही सरकारमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, यात अजून फेरबदल होण्याची शक्यता आहे. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. त्यात इतर समाज घटकांना आणखी स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेवर डोळा
राज्यात 14 महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-भाजप सरकारने त्या त्या जिल्ह्यांना मंत्रीपदे दिली आहेत. तसेच ही मंत्रिपदे देताना जातीय समीकरणाचाही मेळ राखला आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारने सर्वाधिक मंत्रीपदे औरंगाबादला दिली आहेत. औरंगाबाद पालिका ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपचे मंत्री
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखेपाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
गिरीश महाजन
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा
टिप्पणी पोस्ट करा