ब्युरो टीम: बंडखोर आमदार आणि खासदारांमुळं शिवसेनेची अवस्था सध्या नाजूक बनली आहे. पण तरीही ही संधी असल्याचं मानत अनेक मान्यवरांनी आपल्या हातावर शिवंबंधन बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता ओबीसी मोर्चाचे नेते लक्ष्मण हाके यांचाही समावेश झाला आहे. नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण यामागे सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांना शह देण्याचा त्यांचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा या न्यूज पोर्टलशी ते बोलत होते.
हाके म्हणाले, महाराष्ट्रात सध्या शिवसेना अडचणीत असल्याचं म्हटलं जातं पण अशी परिस्थिती नाही. उलट शिवसेनेत जी अडगळ होती ती बंडखोर आमदार खासदारांमुळं दूर झाली आहे. त्यामुळं आता नव्या दमाचे लोक शिवसेनेत दाखल होत आहेत. अडचणीत असतानाही शिवेसेनेत इनकमिंग वाढलं आहे.
शिवसेनेत प्रवेशामागचं कारण काय?
महाराष्ट्रात शिवसेना मराठी अस्मितेसाठी लढणारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यांवर उतरुन आंदोलनं करणारी संघटना आहे. आज देशपातळीवर अनेक प्रादेशिक पक्ष अडचणीत असताना शिवसेना एकटी हिंम्मत दाखवत आहे. ही हिंम्मत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला आवडलेली आहे. शिवसेना अडचणीत आहे असं देश स्तरावर वातावरण असताना सर्वात जास्त चर्चा शिवसेनेची होत आहे.
आदित्य ठाकरेंच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. मी ज्या भागातून येतो त्या भागात तानाजी सावंत सारखा किंवा सांगोल्यातील शहाजी बापू पाटील हे किरकोळ मतांनी निवडून आलेले आमदार आहेत. या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील अठरापगड जातीच्या वाड्यावस्त्यांवरुन तिथल्या लोकांना भूलथापा आणि पैशांची पेरणी करुन ही माणसं विधानसभेत निवडून गेली. या माणसांना घरी बसवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश आहे.
...तर शहाजी पाटलांविरोधात लढणार
शिवसेना माझ्यावर जी जबाबदारी टाकेल ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. येत्या काळात पंचायत समितीपासून, झेडपीपासून प्रत्येक निवडणूक शिवसेना लढवेल. सांगोल्यातून जर शहाजी पाटलांविरोधात मला संधी मिळाली तर मी लढणार, असंही यावेळी लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं.
टिप्पणी पोस्ट करा