'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन


ब्युरो टीम: दलाल स्ट्रीटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. अवघ्या 5 हजार रुपयांपासून सुमारे 43.39 कोटींचा पल्ला गाठणारे झुनझुनवाला 62 वर्षांचे होते. त्यांनी गत आठवड्यातच 'अकासा' एअरलाइंसच्या माध्यमातून एव्हिएशन सेक्टरमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर लगेचच ही धक्कादायक बातमी आली आहे. झुनझुनवाला यांनी 1992 च्या हर्षद मेहता घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून मोठा नफा मिळवला होता.

प्रदिर्घ आजारामुळे निधन

       यासंबंधीच्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांना रविवारी सकाळी 6.45 च्या सुमारास मुंबईच्या Breach Candy रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले -'राकेश झुनझुनवाला एक दुर्दम्य इच्छाशक्तीचे व्यक्ती होते. जीवनाने परिपूर्ण, विनोदी व अंतर्दृष्टी असलेल्या झुनझुनवालांनी आर्थिक जगतावर आपली अमिट छाप सोडली. भारताच्या प्रगतीसाठी ते कायम उत्सुक असत. त्यामुळे त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीय व चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.'

भारताचे वॉरेन बफेट

         राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणूनही ओळखले जात होते. त्यांना भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जात होते. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. अकासा एअरलाइंसमध्ये राकेश व त्यांच्या पत्नी रेखा यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या दोघांकडे या कंपनीची एकूण 45.97 टक्क्यांची भागिदारी आहे.

गत महिन्यातच वाढदिवस साजरा

      झुनझुनवाला यांचा गत 5 जुलै रोजीच वाढदिवस होता. 'त्यांनी मातीलाही स्पर्श केला तर तिचे सोने होईल,' असे त्यांच्याविषयी म्हटले जात होते. त्यांनी 36 वर्षांपूर्वी अवघ्या 5 हजार रुपयांच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या प्रवासाची सुरूवात केली. त्यांचा जादुई स्पर्श ज्या शेअरला झाला, ती कंपनी रातोरात शिखरावर पोहोचत होती. यामुळेच त्यांच्या प्रत्येक चालीवर गुंतवणूकदारांची नजर राहत असे. यामुळे त्यांना भारताचे वॉरन बफेट म्हणून ओळखले जात होते.

कॉलेजचे शिक्षण घेताना शेअर बाजारात प्रवेश

      झुनझुनवाला यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच शेअर बाजारात प्रवेश केला होता. त्यांनी इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटमधून सीएची पदवी घेतली. त्यांचे वडील प्राप्तिकर अधिकारी होते. त्यांच्या माध्यमातूनच त्यांच्या मनात शेअर बाजाराची आवड निर्माण झाली.

        झुनझुनवाला 'RARE' एंटरप्राइजेस नामक एक खासगी ट्रेडिंग फर्म चालवत होते. याची स्थापना त्यांनी 2003 मध्ये केली होती. या कंपनीचे पहिले 2 शब्द 'RA​'​​​​​​ त्यांच्या नावाने होते. तर 'RE'​ हे दोन शब्द त्यांची पत्नी रेखाच्या नावाचे होते.

-----------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने