ब्युरो टीम: काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चेतावणी देत आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील अशी धमकी वजा इशारा दिला होता. त्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांचे काय झाले घात की अपघात? अश्या आशयाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात धर्मवीर आनंद दिघे यांचा नावाचा मुद्दा उचलून राजकारणाला वेगळे वळण येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव केलेल्या भाषणात शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता चांगलाच घणाघात केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी जर मुलाखत घेतली तर अनेक राजकीय भूकंप होतील. आमच्यावर जर सातत्याने आरोप केले जात असतील. आमचे आई बाप काढले जात असतील, आम्हाला गद्दार ठरवलं जात असेल तर मला देखील मुलाखत घेऊन तोंड उघडाव लागेल, भूकंप करावं लागेल असे मत भाषणांमधून मांडले होते. या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करून जो मुद्दा मांडला. मात्र त्यांच्या याच वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
२६ ऑगस्ट २००१ ला धर्मवीर आनंद दिघेंचे काय झाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल नक्की काय गौप्यस्फोट करणार? याकडे शिंदे गटासह, उद्धव ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांसोबत इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्षं लागलं आहे. ठाण्यात अशाच आशयाचे बॅनर्स देखील लागले आहेत. ठाण्यातील महेश परशुराम कदम या माजी नगरसेवकांनी ठाण्यात हा बॅनर लावला आहे. या बॅनर मध्ये "२६ ऑगस्ट २००१ ला नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात? असा प्रश्न उपस्थित करत लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे" असा जाब विचारला आहे. केलेल्या वक्तव्याचा लवकरात लवकर उलघडा करण्याची मागणी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.
मात्र आता या बॅनरमुळे धर्मवीर आनंद दिघे यांचा मुद्दा हा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा मुद्दा उचलून अनेक राजकीय हालचाली होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा