विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवेंचे नाव निश्चित

 


मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता  हा शिवसेनेचा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी औरंगाबादचे आमदार अंबादास दानवेयांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाकडून काही वेळापूर्वी दानवे यांच्या नावाचे पत्र विधीमंडळ सचिवांना देण्यात आले आहे.

       शिवसेनेकडून (ठाकरे गट) विधान परिषदेच्या सभापतींना एक पत्र देण्यात आले होते. त्या पत्रात विधान परिषदेतील संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता. खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे, रवींद्र वायकर आणि सुनील शिंदे हे काही वेळापूर्वी विधीमंडळात आले होते. त्यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करण्यात यावे, अशा स्वरुपाचे पत्र विधीमंडळाच्या सचिवांना देण्यात आले आहे.

       विधान परिषदेत शिवसेनेचे १३ आमदार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत असतानाही शिवसेनेकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यात आला होता. विधान परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० आमदार आहेत, त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने या पदावर दावा केला होता. त्यानुसार हे पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून त्यासाठी दानवे यांचे नाव पक्के झाल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या असल्याने अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड करण्यात आली होती.

       दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला आहे. त्यातही औरंगाबादमधील शिवसेनेचे बहुतांश आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत, त्यामुळे आक्रमक आणि हिंदुत्वाचा चेहरा असलेले अंबादास दानवे यांचे नावे आता शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आले असावे, असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने