ब्युरो टीम: शहरात पाऊस पडत आहे. पालिकेच्या धरणांतही समाधानकारक पाऊस पडला आहे, पण सानपाडा परिसरातील रहिवासी अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त आहेत. वर्षभरापासून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना दैनंदिन वापरासाठी समाधानकारक पाणी मिळत नाही. त्यामुळे सानपाडा विभागातील पाण्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
सानपाडा विभागात सानपाडा रेल्वे रूळांलगत असलेल्या सानपाडा गाव, गावठाण, गावठाण विस्तार आणि सिडको नोड वसाहतीमध्ये मागील वर्षभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सानपाडा विभागात सानपाडा सेक्टर चार मधील जलकुंभ तसेच जुईनगर येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु सानपाडा पाममार्गे असलेल्या मुख्य जलवाहिनीद्वारे येत असलेले मोरबे धरणाचे पाणी अद्यापपर्यंत सानपाडा विभागाला मिळत नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. पाण्यासाठी घरी थांबून राहावे लागते. सानपाडा हा शहरातील सर्वाधिक गृहसंकुले असून गेल्या काही वर्षांत हा विभाग विस्तारला आहे. अनेक रहिवासी इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. जलकुंभावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे सानपाडा कारशेड मार्गे रेल्वे पटरी अंतर्गत उड्डाणपुलालगत मुख्य जलवाहिनीसाठी मार्ग काढला आणि त्यासाठी योग्य ती उपाययोजना केली तर सानपाडा विभागाची पाण्याची तहान पूर्णपणे भागू शकणार आहे.
यासाठी स्थानिक माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्या समोर समस्या मांडली आहे. पाण्याची आत्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय मोरबे धरणाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीद्वारे या भागाला पाणीपुरवठा करावा, यासाठी पाणीपुरवठा विभागाला आदेश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा