मालदीवच्या अध्यक्षांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भेट.

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (जेएनपीए) भेट दिली. यावेळी मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना जेएनपीए चे अध्यक्ष श्री.संजय सेठी यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामधील विविध प्रकल्पांची माहिती दिली.
           जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) च्या नवीन विकासात्मक प्रकल्पांबाबत ते म्हणाले की, भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाच्या दूरदृष्टीनुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराचा विकास, राज्याच्या मध्यवर्ती भागातील ड्राय पोर्ट, फोर्थ कंटेनर टर्मिनल इ. प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतील. या भेटीप्रसंगी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी बंदराच्या एकूण कामकाजाबाबतची माहिती जाणून घेतली तसेच एका टर्मिनलला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष काम कसे चालते, याचे प्रात्यक्षिकही बघितले.
           यावेळी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय सेठी यांनी मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. याप्रसंगी रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जेएनपीए चे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, उपायुक्त शिवराज पाटील, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, उपायुक्त रुपाली अंबुरे व जेएनपीए चे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने