मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे कटकारस्थान, पण नशिबी उपमुख्यमंत्रीपद- किशोरी पेडणेकर



ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना, 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे ऐकले की उद्धव ठाकरेंची आठवण येते असे खोचक वक्तव्य करीत उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या टीकेला कविता रचून जशास तसे प्रत्युत्तर दिले.


अमृतांकडे अपमान करण्याचे कंत्राट


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सर्व नेत्यांचा अपमान करण्याचे कंत्राट अमृता फडणवीसांना दिले. अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली? अशा शब्दांत अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. विशेषतः त्यांनी या रचलेल्या ओळी गाऊनही दाखवल्या.


किशोरी पेडणेकरांनी रचली ही कविता


''एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव


मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केली


त्याला एका 'अमृता'ची दृष्ट लागली हो..


त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले...''


काय म्हणाल्या होत्या अमृता


एका खाजगी कार्यक्रमात अमृता फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना पिंजरा या मराठी चित्रपटातील 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकवण्यात आले होते आणि हे गाणे ऐकून कुणाची आठवण येते हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "माननीय उद्धव ठाकरे, त्यांचा खूप मान सन्मान आहे पण त्यांच्या आयुष्याची खरंच नशिबाने थट्टा मांडली आहे."


सर्व थरातून टीका

उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान आहे, पण त्यांची नशिबानेच थट्टा माडली असे वक्तव्य अमृता फडणवीसांनी एका कार्यक्रमात प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर एक कविता रचत टीका केली. याशिवाय अन्य राजकीय नेत्यांनीही या वक्तव्यावर टीका केली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने