जनता सत्तामेव नव्हे तर सत्यमेव महत्व देते- आदित्य ठाकरे

 



ब्युरो टीम: 
गद्दारीकरूनही बंडखोरांना बाबाजीका ठुल्लू मिळाला. मात्र, लक्षात ठेवा जनता ही सत्तामेव नव्हे, तर सत्यमेव जयतेला महत्त्व देते, असा हल्लाबोल शनिवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
       आदित्य यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. भरपावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती.
हे सरकार कोसळणार!
      आदित्य म्हणाले, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी झाली, गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. त्यांना ठाऊक आहे कोण विकास काम करतो, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. त्यामुळे हे गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सरकार गेल्याचं दुःख नाही!
      आदित्य ठाकरे म्हणाले की, हिंदू हृदयसम्राटांचे त्यांच्यात विचार असते, तर आसाममध्ये पूर आला तिथे मदत करायला गेले असते. पण मजा मारत बसले. प्रत्येक गद्दाराच्या मतदार संघात जाऊन गदाराबद्दल सांगणार म्हणजे सांगणार, असा इशारा त्यांनी दिला. 'सरकार गेल्याचं दुःख नाही, ते तुम्ही परत आणाल, पण प्रगतिशील महाराष्ट्र रोखण्याच काम यांनी केले. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याच काम उद्धव ठाकरेंनी केले, याचे जगाने कौतुक केले पाहिजे. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल, म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारे आपले हिंदुत्व आहे. देशात आपले नाव होत होते हेच त्यांच्या पोटात दुखले. बंड करायला हिम्मत लागते, यांनी गद्दारी केली. गुवाहटीला गेले, तिकडे काय काय केले आपण पाहिले. गुवाहटीत गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते, मजा करत होते, पण तिथला पूर त्यांना नाही दिसला, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
हीच त्यांची लायकी
      पुढे शिंदे गटावर टीका साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे हिंदुत्वासाठी गेले नाहीत, तर एक दोन लोकांच्या स्वार्थासाठी ते गेले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या सुपुत्राने राजीनामा दिला. तेव्हा टेबलावर चढून बारमध्ये नाचतात, तसे हातवारे करत नाचत होते. उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली तेव्हा या 40 जणांनी काम करण्याऐवजी आपले सरकार उभारायची स्वप्न पाहिली, कोणी आपल्या आई वडील वा गुरुबाबत असे करेल का? स्वतःला खोके कसे मिळतील? स्वतःच ओके कसं होईल ते पाहत होते हे. पहिली गद्दारांची बॅच गेली, त्यापैकी किती जणांना मंत्रिपद मिळाले? आपल्याकडे यांना चांगलं पद दिली होती, तिकडे जाऊन काय मिळाले? हीच त्यांची लायकी होती, असा उल्लेखही त्यांनी केला.
--------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने