शिंदे-फडणवीसांची भेट का घेतली? रोहित पवारांनी कारण केले उघड

 


   ब्युरो टीम: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  ठाण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांचे नातू रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची मंत्रालयात भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही  तिकडे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये 10-15 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीचं कारण सांगितलं.

      विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

     राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे रोहित पवार आणि शिंदे-फडणवीस भेटीच्या टायमिंगाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

           विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाईल, असं वक्तव्य केलं होतं, त्यावेळी रोहित पवारांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता. 'ओव्हरसीज बँकेत 52 कोटींचा घोटाळा आणि पीएनबी बँकेच्या घोटाळ्यात नाव आलेल्या मोहित कंबोज यांच्याबद्दलच तुम्ही मला विचारलं आहे ना. मी अजून त्यांना कधी भेटलेलो नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलं आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते,' असा टोला रोहित पवारांनी लगावला होता.

          'आतापर्यंत किरीट सोमय्या विरोधी पक्षांवर आरोप करायचे, पत्रकार परिषद घ्यायचे, ट्वीट करायचे, यातून त्यांना कव्हरेज मिळायचं. आपल्यालाही असंच कव्हरेज मिळावं म्हणून कंबोज असं करत असावेत,' असं वक्तव्यही रोहित पवार यांनी केलं होतं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने