ब्युरो टीम: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जीएसटीवरुन राज्य सरकारवर टीका करताना छगन भुजबळांनी चांगलीच टोलेबाजी केली. छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, याचा मला विशेष आनंद आहे. कारण महाराष्ट्रात प्रथमच दाढी असणारे मुख्यमंत्री झाले आहेत.
यावेळी स्वत:च्या पांढऱ्या दाढीवर हात फिरवत भुजबळ म्हणाले, दाढीवाले मुख्यमंत्री झाले असले तरी त्यात सफेद आणि काळी दाढी असा फरक आहे. राज्यात काळ्या दाढीवालेंचा प्रभाव असला तरी देशभरात मात्र सफेद दाढीवाले प्रभावी आहेत. भुजबळांच्या या वक्तव्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला.
भाषणावर जीएसटी नको
भुजबळ म्हणाले, भारताच्या वित्तमंत्री सातत्याने भारतात सर्व काही व्यवस्थि आहेत, असे सांगतात. सर्व व्यवस्थित असेल तर सर्वच वस्तूंवर जीएसटी का लावला जात आहे? तुमच्याकडे एवढे चमचे असूनही तुम्ही चमच्यांवरही जीएसटी लावला आहे. आता किमान भाषणावर जीएसटी लावू नका, एवढी विनंती आहे. अन्यता 1 मिनिट भाषण झाले की एवढा जीएसटी, 2 मिनिटांनंतर एवढा जीेसटी, असे सुरु कराल, असा टोला भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
सामान्यांना फटका
भुजबळ म्हणाले, आतापर्यंत अन्नधान्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. मात्र, जीएसटी परिषदेने आता या वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. या निर्णयामुळे पॅकिंग अन्नधान्य पदार्थ, पीठ, मैदा, दूध ,रवा, दुग्धजन्य पदार्थ, दही, सोयाबीन, मटर, गहू या सर्वांवर 5 टक्के जीएसटी लागला आहे. याचा सर्वसामान्यांनाच सर्वाधिक फटका बसणार आहे.
केंद्राकडे व्यथा मांडा
भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने काही निर्णय मंजूर केले की तुम्ही त्या निर्णयांची राज्यातही अंमलबजावणी करता. त्यामुळे राज्यात अगदी पेन्सिल, खोडरबर यावरही जीएसटी लागला आहे. स्कुल चले हम, जीएसटी के साथ, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. रुग्णालयातरही 5 हजारांच्या पुढे बील गेले की त्यावर जीएसटी आहे. अशा स्थितीत केंद्राचे निर्णय राज्यात लागू करताना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांनी किमान महाराष्ट्राच्या जनतेच्या अडचणी केंद्राकडे सांगायला हव्यात, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्र्यांचा दरारा मोठा
भाजपच्या नव्या संसदीय मंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन भुजबळ म्हणाले, आता दिल्लीतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दरारा वाढला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचाही दरारा आहेत. देशातच नव्हे तर परदेशातही शिंदेंच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. तुम्ही त्यांच्या व्यथा केंद्रापुढे मांडाल, अशी अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा