काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून ‘या’ नावाला अध्यक्षपदासाठी पहिली पसंती

 


     कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचच लक्षं लागलं आहे. अशात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पहिली पसंती दिली आहे. मात्र, अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या नावाला विरोधही आहे.

सलमान खुर्शीद यांची राहुल गांधींच्या नावाला पसंती

       काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावालाच पहिली पसंती दिली आहे. अध्यक्षपदासाठी राहुल हेच ‘पहिले’ आणि ‘एकमेव’ पर्याय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खुर्शीद यांनी ही माहिती दिली . परदेशातून आल्यानंतर अध्यक्षपदासाठी राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही खुर्शीद म्हणाले.

काँग्रेसला गळती

          जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांच्या पाठोपाठ तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस खासदार राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधींची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही”, असं खान यांनी म्हटलं होतं. तर राहुल गांधी अपरिपक्व आणि बालिश आहेत, असा शाब्दिक हल्ला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी केला होता. त्यामुळे आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास राहुल गांधींचा नकार

          राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची धूरा गांधी परिवारातील बाहेरच्या नेत्याकडे जाणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीचे वेळापत्रक

            काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. याबाबतची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवली जाईल. तर मतमोजणी १९ ऑक्टोबरला पार पडणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने