ब्युरो टीम: द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला (पहिल्या प्रतिभाताई पाटील) आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी द्रौपदी मुर्मू एका आलिशान कारने राष्ट्रपती भवन येथे पोहोचल्या होत्या. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासाठी सुरक्षित कार डिझाईन केल्या जातात. द्रौपदी मुर्मू यांची कारदेखील आपल्या देशात उपलब्ध असलेल्या सुरक्षित कार्सपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला मुर्मू यांच्या शानदार कारबद्दलची माहिती देणार आहोत. मर्सिडीज मेबॅक एस ६०० पुलमन गार्ड असं या कारचं नाव आहे. ही कार देशाचे पहिले नागरिक (राष्ट्रपती) कुठेही घेऊन जाऊ शकतात. यासह ही कार देशाचे महत्त्वाचे अतिथी यांना विमानतळावरून आणण्यासाठी देखील पाठवली जाते.
कशी आहे मर्सिडीझ मेबॅक एस ६०० पुलमन गार्ड?
राष्ट्रपतींकडे असलेली मर्सिडीज मेबॅक एस ६०० पुलमन गार्ड ही एक अत्याधुनिक आणि सुरक्षित कार आहे. सुरक्षा, इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत ही दमदार कार आहे. ही कार खास राष्ट्रपतींसाठी कस्टमाईज करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यात बुलेटप्रूफ कार्स असतात. यापैकी काही कार्स या आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जातात. तर काही दररोज वापरल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला मेबॅक एस ६०० पुलमन गार्ड या कारबद्दल माहिती देणार आहोत.
पूर्णपणे आर्म्ड कार
राष्ट्रपतींची कार VR9-लेव्हल बॅलिस्टिक सुरक्षेसह सुसज्ज आहे. यात ४४ कॅलिबर सुरक्षेसह हँडगन शॉट्स, कार हँडगन शॉट्स, मिलिटरी रायफल शॉट्स, बॉम्ब, स्फोटके आणि गॅस हल्ल्यांपासून सुरक्षितता प्रदान केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार बुलेटप्रूफ अलॉय व्हील आणि टायर्ससह सुसज्ज आहे. यासह गॅस हल्ल्याच्या वेळी राष्ट्रपतींना कारमध्ये ऑक्सिजन पुरवता येईल, अशी व्यवस्था देखील यात करण्यात आली आहे.
पुलमॅन गार्डचे स्पेसिफिकेशन्स
मर्सिडीज मेबॅक एस ६०० पुलमन गार्डची लांबी ५४३३ मिमी, रुंदी १८९९ मिमी आणि उंची १४९८ मिमी इतकी आहे आणि या कारचा व्हीलबेस ३३६५ मिमी इतका आहे. या कारमध्ये ६.० लीटर व्ही १२ पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ५३० बीएचपी पॉवर आणि ८३० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. हे इंजिन ७ स्पीड डीसीटी गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. ही कार एअर सस्पेन्शन आणि रन फ्लॅट टायर्ससह येते. ही कार जास्तीत जास्त १६० किमी प्रति तास इतक्या वेगाने धावू शकते
टॉप स्पीड आणि किंमत
कारमध्ये एक दमदार इंजिन दिलं आहे. त्या जोरावर ही कार अवघ्या ८ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण करण्यास सक्षम आहे. या कारचा टॉप स्पीड १६० किमी प्रति तास इतका आहे. या कारमध्ये केवळ ४ जण बसू शकताता. तसेच यात ५३० लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये ८० लीटर क्षमतेचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास सरकारने यासाठी १० कोटी रुपये मोजले आहेत, असं म्हटलं जातं. कारचे फीचर्स, सेफ्टी फीचर्स पाहता कारची किंमत योग्य आहे.
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांना २२ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ६४.०३ टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर २५ जुलै रोजी त्यांचा शपधविधी झाला आणि त्या अधिकृतपणे भारताच्या राष्ट्रपती बनल्या आहेत. मुर्मू या भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदच्या उमेदवार होत्या तर यूपीएसह इतर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली होती. मुर्मू यांच्याविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वातंत्र्य भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. तसेच त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्याविषयीची आणखी एक गोष्ट म्हणजे ओडिशा राज्यातून येणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
टिप्पणी पोस्ट करा