पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-बसची 'बॅटरी लो' होण्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.बॅटरी संपल्यामुळे बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 2019 मध्ये दाखल झालेल्या काही ई-बसच्या बॅटरी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) येथे तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात सध्या पीएमपीच्या 312 ई-बस मार्गावर आहेत. तर, 130 बस अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत निगडी डेपोमध्ये उभ्या आहेत. पुण्यात 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 25 ई-बस दाखल झाल्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने 300 बस दाखल झाल्या. शहरातील प्रामुख्याने लांब पल्याच्या मार्गावर या ई-बस चालतात. या ई-बसच्या बॅटरीची चार्जिंग टीकत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. बस चार्जिंग करून पुन्हा मार्गावर धावण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे पीएमपीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार या बस धावत नाही.
लांब पल्याच्या मार्गावर ई-बसच्या पहिल्या शिफ्टमध्ये दोन आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दोन अश्या ऐकूण चार फेऱ्या माराव्या लागतात. पण सकाळच्या शिफ्ट मधील दोन फेऱ्या आणि दुपारच्या शिफ्टमधील एक फेरी पूर्ण झाल्यानंतर बसची चार्जिंग संपते. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस सायंकाळी या मार्गावरील ई-बस रद्द किंवा दीड ते दोन तास उशिरा धावतात. बसची चार्जिंग संपली असेल तर त्या मार्गावर दुसरी ई-बस किंवा सीएनजी बस पीएमपीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे प्रवाशांना बसची तासन्तास वाट पाहवी लागते. दरम्यान, पीएमपीला आतापर्यंत फेम-1 व 2 अंतर्गत 600 बस दाखल होणे अपेक्षित होते. पण, अद्यापपर्यंत दाखल झालेल्या नाहीत.
बॅटरी लो होऊ नये म्हणून एसी बंद
पीएमपी ई-बसची बॅटरी लो होते म्हणून चालक बसमधील एसी बंद करतात. या बस पुर्णपणे बदीस्त असल्याने एसी बंद केल्यास नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येतात. जर बॅटरी लो असेल तर या बस मार्गावर चालवल्या जातातच का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
कोट-
पीएमपीच्या जुन्या ई-बसच्या बॅटऱ्या उतरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार दोन ई-बसच्या बॅटऱ्या सीआयआरटीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामधून बॅटऱ्यांची परिस्थिती समजून येईल.
– चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
टिप्पणी पोस्ट करा