रोहित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीननंतर चर्चांना उधाण
ब्युरो टीम:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होते. जवळपास १० ते १५ मिनिटांची ही भेट झाली. भाजपाच्या मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
मोहित कंबोजांचा रोहित पावारांना इशारा
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झाला आहे.
मोहित कंबोजांच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया
पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी भाजपावर टीका केली आहे. रोहित पवारांचं काय होणार? याची भविष्यवाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजपा नेते त्याआधीच असं होणार, तसं होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, आज यांच्या घरावर धाड पडणार, यांचं अमुक होणार, त्यांचं तमुक होणार आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे
-------------------
टिप्पणी पोस्ट करा