मुंबई: एसी लोकलची संख्या वाढवल्यानंतर सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. आजही एसी लोकलमुळे सामान्य फास्ट लोकल रद्द करण्यात आली, त्यानंतरच्या लोकलला दोन गाड्यांची गर्दी झाली, त्यामुळे बदलापूर स्टेशनवर प्रवाशांनी आंदोलन केलं. याआधी एसी लोकलमुळे कळवा स्टेशनवरही आंदोलन करण्यात आलं.
मुंबईतल्या काही ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एसी लोकलच्या मुद्द्यावरून आज रेल्वेच्या जीएम यांची भेट घेतली आणि त्यांना काही पर्याय सुचवले. लोकांना त्यांच्या सध्या लोकल हव्या आहेत, त्यांना त्या देवून अतिरिक्त एसी लोकल देण्यात याव्यात, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी जीएमना भेटल्यानंतर केली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये यावर तोडगा काढू, असं आश्वासन जीएम यांनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं
'आम्ही काही डबे एसी आणि काही नॉन एसी करता येतील का? सहा डबे एसी आणि सहा नॉन एसी करता येतील का ते पाहा, असं जीएमना सांगण्यात आलं आहे,' अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
मुंबईतल्या सर्व लोकल 5 डब्यांच्या करण्यात याव्यात अशीही आमची मागणी आहे. एसी लोकलचा प्रश्न लवकर सोडवला जाईल, असं त्यांनी सांगितलं, पण तसं झालं नाही तर आम्ही जनतेच्या सोबत आंदोलन करू, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभेत एसी लोकलच्या मुद्द्यावरून कळवा कारशेडमध्ये झालेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. 'रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी जीवाचा खेळ झाला आहे. ज्याची गरज आहे त्याकडे लक्ष न देता ज्याची गरज नाही; त्या सोईसुविधा वाढविण्यासाठी रेल्वे प्रयत्न करीत आहे. 90 टक्के लोकांना एसी लोकलची गरजच नाहीये', असं आव्हाड विधानसभेत म्हणाले.
कळवा ते सीएसएमटी एसी ट्रेनचं रिटर्न तिकीट 200 रुपये आहे, तर लोकलचा सामान्य महिन्याचा पास 215 रुपये आहे, त्यामुळे लोकांच्या मनात उद्रेक आहे. हा उद्रेक मुंबईमध्ये दिसत आहे. कोणीही न बोलावता 700 लोक येणं हे आश्चर्यकारक आहे. शासनाने हा प्रश्न गांभिर्याने घ्यावा. हे कायदा सुव्यवस्थेमध्ये रुपांतरित होऊ शकतं, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
-------------------
टिप्पणी पोस्ट करा