‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

मुंबई : कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने त्यांचे शिक्षण योग्य रितीने झाले नाही. अनेक विषयात हे विद्यार्थी मागे पडले आणि त्यांच्यावर ‘कोरोना पास’चा शिक्का बसला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत एका विशेष योजनेची घोषणा विधिमंडळात केली. यामुळे ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

       राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये कोरोना कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा विधीमंडळात केली.

           चालू शैक्षणिक वर्षामधील पदवी व पदव्युत्तरच्या सर्व विषयांसाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त शैक्षणिक उपक्रम आहे व त्यामध्ये सहभागी व्हावे अथवा नाही हे ठरविण्याची विद्यार्थ्यांना मोकळीक असेल. या उपक्रमाची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रत्येक विषय शिक्षकावर देण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

           कोरोना काळात शिक्षणात अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाहीत. त्यामुळे त्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येईल. प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान पाच तासिका आयोजित करायच्या आहेत. सेतू अध्ययन उपक्रमाचे वेळापत्रक महाविद्यालयांनी करून त्याची अंमलबजावणी करायची आहे. शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे.

            प्रथम सत्रात हा उपक्रम १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करायचा आहे तर दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण करता येईल. या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित पूर्वज्ञान झाले का, याची खातरजमा करण्यासाठी परीक्षा घेण्यात येईल. हा उपक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

-------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने