“तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार” रश्मिका मंदानाचा महिलांना मोलांचा सल्ला

 


          नॅशनल क्रश म्हणून ओळख असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच चर्चेत असते. ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकली. लवकरच रश्मिका बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. हे यश रश्मिकाने कसे मिळवले याबद्दल तिने सांगितले, यावेळी बोलताना तिने महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले.

     नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने अभिनय क्षेत्रातल्या तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. यात तिने तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी लहान असताना एकदा आईने मला सांगितले, तू रागात आहेस, चिडलेली आहेस, दुःखी आहेस हे तू समोरच्या व्यक्तीला दिसू द्यायच नाही. तुझी कोणतीही नकारात्मक भावना तू कमजोर असल्याचे दाखवते.”

       कदाचित याच गोष्टीमुळे मला रडायचे कसे हे माहीत नाही, मला रडण्याचा अभिनय करता येत नाही. स्क्रीनवर रडण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागते,” असे ती म्हणाली. रश्मिका मंदाना अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी कर्नाटक मधील कोडगू जिल्ह्यातील विराजपेट या शहरातील सामान्य मुलगी होती. याबाबत रश्मिका म्हणते, “मला स्वत:साठी एक मोठं प्रेमळ राज्य बनवायचे आहे. हे मी स्वत:साठी बनवणार आहे आणि एक कोडगूमधील सर्वसामान्य मुलगी हे करु शकते तर तुमच्या प्रत्येकामध्ये किती क्षमता आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता.”

       या जगात महिला त्यांना हवे ते करू शकतात. माझी त्यांना विनंती आहे मोठी स्वप्न बघा, थांबू नका, परिश्रम करत रहा. कोणी तुमच्यावर हसत असेल, तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा आणि मेहनत घेत रहा. जर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली नाही तर दुसरं कोणीही करणार नाही. त्यामुळे तुम्हालाच ती पूर्ण करावी लागतील. तुम्ही तुमची स्वप्न नक्की सत्यात उतरवाल अशी माझी आशा आहे,” असेही ती म्हणाली.

     रश्मिका मंदानाचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी उत्सुक आहेत. ती ‘मिशन मजनू’, ‘गुड बाय’ आणि ‘एनिमल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘मिशन मजनू’मध्ये रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे. तर ‘अ‍ॅनिमल’मध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर दिसणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने