देशातील पत्येक घरांना ओढ आता तिरंग्याची!



 ब्युरो टीम: नागरिकीकरणामध्ये कोणतेही लोकशाहीप्रधान राष्ट्र हे नागरिकांना कायद्याने सज्ञान करण्यावर भर देत असते. शिक्षणाच्या माध्यमातून हा जबाबदार नागरिकत्वाचा पाया भक्कम होत असतो. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा भारतीय म्हणून विचार करू तेव्हा स्वाभाविकच प्रत्येकाची मान आपल्या लोकशाही प्रगल्भतेबाबत उंचावल्याशिवाय राहणार नाही. पारतंत्र्यातील असंख्य जखमा अंगावर घेऊन आपण स्वतंत्र झालो. एका बाजुला फाळणीची ताटातूट तर दुसऱ्या बाजुला काही भागात पेटलेल्या दंगली भारताने स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत अनुभवलेल्या आहेत.

    स्वातंत्र्य लढ्याचा मुख्य पाया हा अहिंसात्मक लढ्याचा, सहनशिलतेचा, सहिष्णुतेला प्राधान्य देणारा होता. हे मूल्य प्राधान्याने जर कोणी दिले असेल तर ते म्हणजे महात्मा गांधी यांनी. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रेरणेसाठी अनेक प्रतिक म्हणून आपण जवळ केलीत. या प्रतिकात राष्ट्र भावनेला जागृत करणारी गीते होती, शांतता पूर्ण एकात्मता साधत सूत कातण्यासाठी वापरलेला चरखा होता, विदेशी कपड्यांचा त्याग करून आपल्या स्वदेशी कापसातून विणलेले जाडे-भरडे खादीचे कापड होते, डोक्यावर चढवलेली साधी टोपी सुद्धा होती. या प्रतिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला अधिक पवित्र केले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

     भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने दिलेले योगदान व त्यासाठी असलेली तळमळ आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय सहन केले नसेल? याची साक्ष जर घ्यायची असेल तर जालीयनवाला बाग येथील बंदुकीच्या गोळ्यांनी आपल्या पंजाबी बांधवांच्या शरीरातून चाळणी झालेल्या भिंती, मूठभर मीठ उचलले  म्हणून रक्तबंबाळ झालेली आपल्या पूर्वजांची डोकी, रस्त्यावर झेललेले चाबुकांचे फटकारे ते नंदूरबार येथे भर शहरात बाल झालेला आपला शिरीषकुमार… सारा आलेख किती घेणार आपण डोळ्यांपुढे ! सायमन परत जा पासून भारत छोडो आंदोलनापर्यंत.

      स्वातंत्र्याच्या इतिहासाला जर आपण सतत प्रवाहित ठेवले तर यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती, हुतात्म्यांप्रति आणि स्वातंत्र्याच्या मूल्याप्रति आपल्याला अधिक प्रामाणिक व राष्ट्राशी कटिबद्ध होता येईल. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील पाऊलखुणांना जपत ते मूल्य, ती प्रेरणा, ती राष्ट्र भक्ती, ती कटिबद्धता, त्यावेळी एकसंघ होऊन आपल्या पूर्वजांनी जपलेली एकात्मता आणि आपल्या राष्ट्राप्रती कर्तव्य तत्परता जर पुढच्या पिढीपर्यंत अधिक घट्ट पोहोचवायची असेल तर आपल्याला अधिक जबाबदार भूमिका बजवावी लागेल.

    ही भूमिका प्रगल्भ करण्यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्ती दिन व इतर प्रासंगिक दिनानिमित्त होणारे ध्वजवंदन प्रत्येकाच्या मनामनात चैतन्य निर्माण करणारे आहे यात शंका नाही. कधी काळी कित्येक वर्षांपूर्वी शाळेच्या प्रभातफेरीत राष्ट्रप्रेमाचे प्रत्येकाने दिलेले नारे व ती पाऊलवाट प्रत्येकाच्या मनात ताजी असेल. या दिनानिमित्त ध्वजवंदनानंतर झालेले राष्ट‍्रगीत व नकळत तिरंग्याला सलामी देण्याकरिता भूवयांच्या वर हाताची टेकलेली बोटे व मनातील करुणा भाव कसा कोणाला विसरता येईल ? आजही राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपण बहुतांश शहारून जातो, उभे राहून तोंडाने राष्ट्रगीत म्हणतो.

     स्वातंत्र्यदिनापासून ध्वजवंदनेला, राष्ट्रध्वजाला वेगळे पावित्र्य आहे ते यामुळेच. या देशातील प्रत्येक कष्टकऱ्यांपासून, श्रमिकांपासून, शेतकऱ्यांपासून, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून, प्रत्येक नागरिकांपासून सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल एक आदराची भावना आहे. हा आदर असणे स्वाभाविक आहे. यासोबत एक आदरयुक्त भीती  पण आहे. या भितीपोटी अनेक समज व गैरसमजही आहेत. माझ्या राष्ट्राचा ध्वज, तिरंगा हा ठराविक कार्यालय आणि शासकीय मैदानापुरताच मर्यादित न राहता तो माझ्या घरावरही फडकला जावा यात एक परिपक्वता आहे. नागरिक म्हणून प्रत्येकावर टाकलेला हा विश्वास आहे. हा विश्वास प्रत्येकाने आपल्या घरावर निसंकोचपणे तिरंगा लावून तो दृढ केला पाहिजे.

     यात नियमांचा काटेकोरपणा जरूर आहे. प्रामुख्याने हिरवी बाजू ही जमिनीकडे असली पाहिजे तर केशरी बाजू ही आकाशाकडे असली पाहिजे. तिरंग्याचा आकार हा आडवा तीन व उभा दोन म्हणजेच 3 : 2 या प्रमाणात पाहिजे. तिरंगा हा प्लास्टिकचा असता कामा नये. यापूर्वी केवळ खादी, लोकर, सूताच्याच ध्वजाला मान्यता होती. हा निर्णय आता अधिक व्यापक करीत पॉलिस्टर, सिल्क यांचाही वापरता येईल. राष्ट्रध्वज हा घरोघरी उभारण्यासाठी त्याला दोरी लावून शाळेत आपण जसे पाहतो तसेच लावणे अभिप्रेत जरी असले तरी सर्वच इच्छूक नागरिकांना ते जमेलच असे नाही. त्या ऐवजी “हर घर तिरंगा” या उपक्रमात आता आपल्याला आपल्या घरावर हा तिरंगा काठीवर, घरात उपलब्ध असलेल्या पाइपच्या साह्याने उभारता येईल. फक्त पाइपला झेंडा लावल्यानंतर तो व्यवस्थित बांधून घेतला पाहिजे. जेणेकरून वाऱ्यामुळे तो उडून जाणार नाही.

     तिरंग्यावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह लिहू नये. ज्या ध्वजस्तंभावर तो लावला जाणार आहे त्या स्तंभावर दुसरे काही लावू नये. राष्ट्रध्वज हा मळलेला अथवा फाटलेला किंवा चुरगळलेला असू नये. याचा अन्य कोणत्याही प्रकाराच्या शोभेसाठी वापर करता येणार नाही. राष्ट्रध्वज फाटणार नाही याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. थोडक्यात यातील भावना या अधिक स्वच्छ आहेत. तिरंग्याप्रति आदरयुक्त भावना हीच वास्तविक महत्त्वाची गोष्ट आहे.

        लोकांनीही आपल्या तिरंग्याप्रती व या उपक्रमाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहून आपला सहभाग घेतला पाहिजे. यातील जे नियम आहेत ते समजण्यास क्लिष्ट नाहीत. यातील आदरयुक्त भावना महत्त्वाची आहे. आपला तिरंगा हा साहस, धैर्य याचे प्रतीक जरी असला तरी यातील सर्वसामावेशकता महत्त्वाची आहे. नियमांचा अधिक बाऊ न करता मनातली भिती व दडपण प्रत्येक नागरिकांनी बाजूला सारून “हर घर तिरंगा” उपक्रमाकडे बघायला हवे. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला आपल्या घरावर तिरंगा फडकवून प्रत्येकाने साक्षीदार व्हायला हवे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या कालावधीत नागरिक म्हणून आलेले प्रगल्भत्व जपायला हवे. चला… घरोघरी तिरंगा लावण्यासाठी पुढे सरसावू यात. आपणही बदलाचा एक भाग बनू यात.


-विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने